मुंबई : जीवनविद्या मिशनतर्फे देण्यात येणारा ‘सद्गुरू श्री वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना जाहीर केला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत मिशनचे विश्वस्त आनंद राणे यांनी पुरस्कारासह हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचीही माहिती दिली.राणे म्हणाले की, ‘पर्यावरण हाच खरा नारायण’ असा संदेश संस्था देते. त्याअनुषंगाने शिरपूर पॅटर्नचे प्रणेते आणि राज्याचे वॉटर मॅन म्हणून काम करणाऱ्या सुरेश खानापूरकर यांची निवड पुरस्कारासाठी केली आहे. सद्गुरूंच्या धर्मपत्नी शारदामाई यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाईल. यंदा पुुरस्कार सोहळ्याचे दुसरे वर्ष असून, गतवेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला होता. शनिवार, २६ डिसेंबर रोजी घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर येथील रेल्वे पोलीस वसाहतीच्या फुटबॉल मैदानावर हा पुुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडेल. सुमारे २५ हजार साधक या वेळी अपेक्षित असून, त्यासाठी नामांकित राजकीय व्यक्ती, मंत्रिमंडळ सदस्य, उद्योजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.हीरक महोत्सवानिमित्त सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या पुस्तकाच्या १०१व्या आवृत्तीचे प्रकाशन याच ठिकाणी २७ डिसेंबरला केले जाईल. दोन्ही कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता एकाच ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.
सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: December 23, 2015 1:49 AM