ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक केंद्रीय कार्यकारीणीचे सदस्य तथा केंद्राच्या अखिल भारतीय शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख सुरेश केतकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने लातूर येथे निधन झाले़ गेल्या काही दिवसांपासून पार्कीन्सस च्या आजाराने त्रस्त असलेल्या केतकरांनी येथील विवेकानंद रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला़ महिनाभरापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आजारपणातील केतकरांना भेटायला आले होते़
चैतन्याचा झरा असलेले केतकर देशभरातील लाखो संघ स्वयंसेवकांचे जणू पालक होते़ बी़एस़सी, बी़एड चे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी नोकरीही केली़ मात्र नोकरीत मन न रमलेल्या केतकरांनी १९५८ साली संघ कार्यात स्वत:ला झोकून दिले़ पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून गेल्यानंतर ते संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी कामाला प्रारंभ केला़ सोलापूर, सांगली आणि मुुबई महानगर प्रचारक म्हणून काम केल्यानंतर महाराष्ट्र प्रांताचे शारीरीक शिक्षण प्रमुख, पश्चिम क्षेत्र प्रचारक अखिल भारतीय प्रचार प्रमुख आणि अखिल भारतीय शारीरीक शिक्षण प्रमुख या मुख्य पदांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील दुसºया क्रमांकाचे सह-सरकार्यवाह इत्यादी दायित्यांचे त्यांनी कुशलतेने वहन केले़ याशिवाय त्यांनी क्रीडा भारती, संस्कार भारती, अखिल भारतीय किसान संघ अशा अनेक संस्था संघटनांवर यशस्वी काम केले आहे़ त्यांच्या कार्यावर आत्मियतापूर्ण शैलीचा प्रभाव होता़ त्यांच्या निधनाने संघाचा चालता बोलता स्मृतीकोष चिरशांत झाला आहे़
२०१० पासून होता विवेकानंद रुग्णालयातच मुक्काम
मुळचे पुण्याचे असलेले सुरेश केतकर यांच्याकडे १९६० च्या दशकात त्यावेळी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड अशा जिल्ह्यांची जबाबदारी होती़ लातूरमध्ये डॉ़अशोक कुकडे यांना आणून संघाची वैद्यकीय सेवेची शाखा त्यांनीच उघडायला लावली़ त्यांच्यामुळेच लातूर जिल्ह्यात विवेकानंद रुग्णालय उभे राहू शकले़ आयुष्यभर अविवाहीत राहीलेल्या केतकर यांना अखेरच्या काळात वृद्धापकाळी लातुरातील संघ कार्यकर्त्यांनी २०१० साली सेवा आणि सुश्रृषा सुरळीतपणे व्हावी यासाठी पुण्यातून लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात आणले होते़ तेव्हापासून त्यांचा मुक्काम लातूरच्या विवेकानंद रुग्णालयातच होता़ या रुग्णालयातील कर्मचाºयांनी त्यांची मनोभावे सेवा केली़ त्यांच्या निधनानंतर सर्वाधिक हळहळ रुग्णालयातील
कर्मचा-यांमध्ये आहे़
मोहन भागवत यांनी व्यक्त केले दु:ख
सुरेश केतकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शोक व्यक्त केला़ एका निस्वार्थी आणि राष्ट्रीय प्रवाहात आयुष्य झोकून दिलेल्या व्यक्तीमत्वाची पोकळी संघाला कायम जाणवत राहील, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ एक महिन्यापूर्वीच त्यांनी केतकर यांची लातूर येथे भेट घेतली होती़.