Suresh Prabhu: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य सुरेश प्रभू यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. यापुढे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही. आता फक्त पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा आहे, असं सुरेश प्रभू यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात रेल्वे, वाणिज्य अशी दमदार खाती सांभाळली होती. प्रभू पेशाने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आहेत. ते मूळचे शिवसेनेचे नेते, पण मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अगदी ऐन वेळी त्यांना भारतीय जनता पक्षात सामावून घेण्यात आले होते. प्रभू अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. त्यावेळी नद्या जोड प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळेच त्यांना मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.