ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २ - जळगाव घरकूल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर केल्याचे वृत्त धुळ्यात येऊन धडकताच जैन समाजबांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे न्यायालय आवारात येऊन सुरेशदादा जैन यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला.जळगाव घरकूल खटल्यात शुक्रवारी माजी आमदार चिमणराव पाटील यांची साक्ष सुरु होती. सुनावणीसाठी सुरेशदादा जैन हे न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केल्याचे वृत्त येऊन धडकले. न्यायालयाच्या आवारात उपस्थित सुरेशदादा यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी सुरेशदादा जैन यांच्या पत्नी रत्नाभाभी व कन्या मिनाक्षी जैन यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला. त्यानंतर माजी आमदार किसनराव खोपडे, माजी नगराध्यक्ष देविदास शिनकर, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या बाहेर सुरेशदादा यांची भेट घेतली व आनंद व्यक्त केला. काहीकार्यकर्त्यांनी परिसरात पेढे वाटले.सुटकेची प्रक्रियासर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आता त्याची प्रत शनिवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत विशेष न्यायालयास प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.कदम हे पुढील कार्यवाही करतील. त्यानंतर जिल्हा कारागृहातून सुरेशदादा यांची सुटका होईल, अशी माहिती अॅड. जितेंद्र निळे यांनी दिली.