- ऑनलाइन लोकमत
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण : कारागृहाबाहेर स्वागतानंतर जळगावकडे रवाना
धुळे, दि. 3 - जळगाव घरकुल प्रकरणातील संशयित तथा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला होता. शनिवारी धुळे न्यायालयात पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दादांना धुळे कारागृहातून बाहेर येताना पाहण्यासाठी जिल्हा कारागृहाबाहेर समर्थकांची गर्दी झाली होती. १२.५५ वाजता सुरेशदादा कारागृहाबाहेर येताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात कारागृहाच्या मागील बाजूने सुरेशदादा व कुटूंबिय चारचाकी वाहनाने जळगावकडे रवाना झाले.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण
जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित तथा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या जामीनाचे कागदपत्र सकाळी धुळे जिल्हा न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्यावर साधारणपणे दोन तास काम सुरु होते़ त्यानंतर ही कागदपत्रे धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले.
जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित सुरेशदादा जैन यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. त्यांनी जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
अखेर २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती शरद बोबडे आणि न्यायमुर्ती भूषण यांच्या पिठाने ५ लाखांचा जामीन मंजूर केला़ शनिवार सकाळी ११़२० वाजता सुरेशदादा जैन यांचे चिरंजीव राजेश जैन जामीनाचे कागदपत्रं घेऊन धुळे जिल्हा न्यायालयात दाखल झाले़ त्यांनी ही कागदपत्रे अॅड़ जितेंद्र निळे यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी ते या प्रकरणातील विशेष न्यायाधीश आऱ आऱ कदम यांच्याकडे सुपुर्द केले़ यावर धुळे न्यायालयात कामकाज सुरु झाले.
यांनी दिली सॉल्वंन्सी
सर्वोच्च न्यायालयाने ५ लाखांचा जामीन मंजूर केला़ त्यात प्रमोद वाणी आणि विनोद वाणी यांनी प्रत्येकी दोन लाख तर प्रदीप वाणी यांनी एक लाखाची सॉल्व्हंन्सी (जामीन) दिली़ त्यांना न्यायाधीश आऱ आऱ कदम यांनी विचारणा केली आणि जामीन देणाऱ्यांच्या नावाची आणि व्यक्तीची खात्री केली.
कारागृहाबाहेर समर्थक
एकिकडे न्यायालयात जामीनानंतरची प्रक्रिया सुरू असतांना दुसरीकडे कारागृहाबाहेर समर्थकांची संख्या वाढत होती़ दरम्यान साडेबारा वाजता सुरेशदादांचे चिरंजिव राजेश जैन हे वकिलांसह कारागृहात दाखल झाले. कारागृह अधीक्षकांकडे कागदपत्रे दाखल केल्यानंतर काही वेळानंतर सुरेशदादा कारागृहातून बाहेर आले़ दादांचे चिरंजीव राजेश जैन, भाऊ रमेश जैन, मुलगी मिनाक्षी जैन हे यावेळी उपस्थित होते़ दादा कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांच्या कन्या मीनाक्षी जैन यांनी त्यांचे औक्षण केले़ तोपर्यंत कारागृहाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
दादांनी केले अभिवादन
सुरेशदादांनी प्रवेशव्दाराबाहेर उभ्या असलेल्या समर्थकांना अभिवादन केले़ त्यानंतर धुळे व जळगावच्या काही पदाधिकाऱ्यांची भेट घेत सुरेशदादा कुटूंबियांसह कारागृहाच्या मागील बाजूने एमएच १९ सीएफ ३३३ या वाहनाने जळगावकडे रवाना झाले़ त्यामुळे कारागृहाच्या मुख्य प्रवेशव्दाराबाहेर उभ्या असलेल्या समर्थकांचा काहीसा हिरमोड झाला़ दादांच्या सुटकेच्या पार्श्वभुमीवर कारागृहाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
न्यायालय व कारागृह परिसरात समर्थकांची हजेरी
दरम्यान सुरेशदादांना भेटण्यासाठी जळगावहून जैन समाजाचे संघपती दलितचंद चोरडिया (दलूभाऊ जैन), जैन युवक मंडळाचे अध्यक्ष प्रविण छाजेड, माजी महापौर विष्णु भंगाळे, माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंडोरे, प्रमोद वाणी, श्याम कोगटा, महेंद्र शहा, मल्टीमिडीयाचे संचालक सुशिल नवाल, सुनिल श्रीश्रीमाळ, संजय रेदासनी, हेमंत कोठारी, बापू मुणोत, डॉ़ विनोद जैन, निलेश जैन, अनिल सिसोदीया, मनिष लुंकड, विनोद वाणी, जितेंद्र कोठारी, सुभाष सांखला, जितेंद्र छाजेड, रजनीकांत शहा, शेखर कोठारी, प्रकाश वेदमुथा यांच्यासह धुळ्यातील शिवसेना महानगरप्रमुख सतिष महाले, महेश मिस्तरी, मदनलाल मिश्रा, संजय मुंदडा उपस्थित होते.
असा आहे घटनाक्रम
वेळ ११.२०- राजेश जैन धुळे न्यायालयात कागदपत्रं घेऊन दाखल़
वेळ ११.३५- न्यायाधीश आऱ आऱ कदम यांच्याकडे कागदपत्र सादऱ
वेळ ११.४०- अॅड़ जितेंद्र निळे यांच्या नावाचा पुकारा़
वेळ ११.४२- प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात़
वेळ ११.५०- न्यायाधीश कदम यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी़
वेळ १२.२५- जामीनाची कागदपत्रं धुळे कारागृहाकडे रवाना़
वेळ १२.३०- कागदपत्रं धुळे कारागृहात दाखल़
वेळ १२.५५- सुरेशदादा जैन कारागृहा बाहेऱ
वेळ १.००- सुरेशदादा जळगावकडे रवाना़