ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २ - घरकूल प्रकरणात गेल्या साडेचार वर्षांपासून अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला. सध्या सुरेशदादा जैन हे धुळे कारागृहात असून जामिनाची पूर्तता केल्यानंतर ते शनिवारी जळगावात येण्याची शक्यता आहे. घरकूल प्रकरणात दाखल गुन्ह्यात सुरेशदादा जैन यांना १० मार्च २०१२ रोजी रात्री साडेअकरा वाजता धरणगाव रेल्वेगेटजवळ अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरूंगात होेते. त्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात तब्बल १० वेळा दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आज ११वा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने विनाशर्त मंजूर केला. न्या. शरद बोबडे व न्या.भूषण यांच्या द्विसदस्यीय पीठाने दोन बाबींवर विचार करून हा निर्णय दिला. त्यात साडेचार वर्ष भोगलेला कारावास व सर्व प्रमुख साक्षीदारांची झालेली साक्ष, या बाबींचा समावेश होता. जैन यांच्यातर्फे अॅड.कपिल सिब्बल यांनी काम पाहिले. घरकूल खटला सध्या धुळे येथील न्या.आर.आर. कदम यांच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. फिर्यादी प्रवीण गेडाम व तपास अधिकारी ईशु सिंधू यांच्यासह प्रमुख साक्षीदारांच्या साक्ष व उलटतपासणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. २ रोजी माजी नगराध्यक्ष सिंधू कोल्हे यांच्यावर आरोप निश्चितीचे कामकाज सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजुरीचे वृत्त पोहोचले. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विनाशर्त जामिन असल्याने सुरेशदादा जैन शनिवारी जळगावात पोहोचण्याची शक्यता आहे.
सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर होताच शिवसेनेतर्फे फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.