प्रज्ञा केळकर-सिंग,
पुणे- ट्रेडमिलच्या साह्याने घरच्या घरी तसेच जिममध्ये व्यायाम केला जातो. मात्र, ट्रेडमिलच्या वेगाशी समतोल साधता न आल्याने किरकोळ, गंभीर दुखापतीच्या घटना घडतात. त्या टाळण्यासाठी संकेत आणि रिशी या अभियांत्रिकी शाखेच्या दोन विद्यार्थ्यांनी सेन्सरच्या साह्याने ट्रेडमिलचा वेग नियंत्रणात ठेवता येईल, अशा प्रकारचे अनोखे तंत्र विकसित केले आहे. या संशोधनाबाबत विद्यार्थ्यांनी पेटंटसाठी अर्जही केला आहे.वर्क आऊटसाठी ट्रेडमिलचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी ट्रेडमिल हा उत्तम पर्याय आहे, अशी सर्वसाधारण समजूत असते. गेल्या १० वर्षांमध्ये हे उपकरण वापरणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बऱ्याच अद्ययावत ट्रेडमिलमध्ये इनबिल्ट टीव्ही, वायफाय कनेक्शन, वायडर बेल्ट, कस्टम बिल्ट अशा सुविधांचा समावेश असतो. त्याचबरोबर, कन्झ्युमर प्रोडक्ट सेफ्टी कमिशननुसार, ट्रेडमिल सर्वांत धोकादायक फिटनेस उपकरण आहे. मशीन चालू स्थितीत असताना लक्ष भरकटल्यास आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. २००९मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ट्रेडमिलवर व्यायाम करताना १९,००० लोकांना गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये हाडांना इजा, डोक्याला दुखापत आदींचा समावेश होता. अशा इजा टाळण्यासाठी ताथवडेतील जेएसपीएमच्या राजर्षी शाहू कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा संकेत छाजेड आणि पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचा रिषी मदेथट्ट या दोन विद्यार्थ्यांनी ६ महिने मेहनत घेऊन ट्रेडमिलवरील धोका कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन केले आहे.ट्रेडमिलवर धावण्याची गती, चालण्याची पद्धत मोजण्याचे विशिष्ट तंत्र या दोघांनी विकसित केले आहे. या मोजमापासाठी ट्रेडमिलमध्ये वैैशिष्ट्यपूर्ण सेन्सरचा वापर केला जाऊ शकतो. सेन्सरच्या साह्याने व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार वेग नियंत्रित करणे, संबंधित व्यक्ती थकल्यास वेग आपोआप कमी होणे, क्षमतांचा शोध घेऊन त्यानुसार प्रोग्रॅम तयार करणे असे या तंत्राचे उपयोग होऊ शकतात. सेन्सरच्या माध्यमातून मिळालेला डेटा वर्क आऊटचे प्रमाण ठरवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास संकेत आणि रिषी यांनी व्यक्त केला. सेन्सरच्या साह्याने ट्रेडमिल नियंत्रित करता आल्यास दुखापतीच्या घटनांवर नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी सांगितले.>संकेत हा सिव्हिल, तर रिषी हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन शाखेशी संबंधित आहे. ते दोघे पूर्वीपासूनचे मित्र. अभियांत्रिकीचे केवळ पुस्तकी शिक्षण न घेता, दैैनंदिन जीवनात या ज्ञानाचा उपयोग करता यावा, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. जिममध्ये वर्क आऊट करीत असताना त्यांना ट्रेडमिलचे धोके आणि मर्यादा लक्षात आल्या. या मर्यादांवर मात करून ट्रेडमिलचे वर्क आऊट सुरक्षित करता यावे, या दृष्टीने त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. त्यातूनच सेन्सरचे अनोखे तंत्र विकसित झाले.