मुंबई : हृदयाच्या झडपा अकार्यक्षम झाल्यामुळे चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही हृदयाच्या झडपांच्या कार्यात अडथळे येत असल्यामुळे महिलेच्या झडपांसाठी केलेली पाचवी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल १२ तास लागले. जगात पहिल्यांदाच हृदयाच्या झडपांसाठी पाचवेळा शस्त्रक्रिया केल्याची घटना असल्याचे हृदयविकार शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांचे म्हणणे आहे. केम्स कॉर्नर येथे राहणाऱ्या पुष्पा सराफ (६७) यांना १९९८ साली पहिल्यांदा हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. पुष्पा त्यांच्या हृदयाच्या झडपांचे कार्य योग्य पद्धतीने होत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्या झडपांमधून गळती होत असल्यामुळे एरॉटिक वॉल्व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे २००४मध्ये त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. या वेळी झडपांच्या बाजूने गळती होत असल्याचे निदान झाले. म्हणून डॉक्टरांनी पुन्हा (री डू) एरॉटिक वॉल्व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली. पहिल्या दोन्ही शस्त्रक्रिया मुंबईत झाल्या होत्या. मात्र, दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन महिन्यांत पुष्पा यांच्या झडपांना संसर्ग झाला. २००५मध्ये संसर्ग झालेल्या झडपांची तिसऱ्यांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अमेरिकेत करण्यात आली. मात्र, २०१५मध्ये त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. हा त्रास १० महिन्यांत वाढत गेला. ९ जानेवारी २०१६ रोजी ट्रान्स कॅथेटर एरॉटिक रिप्लेसमेंट (टावी) शस्त्रक्रिया एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी पुष्पा यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्या वेळी असे लक्षात आले की, ‘टावी’ करून बसवलेली झडप हृदयात सरकली आहे. त्यामुळे हृदयाचे कार्य योग्य पद्धतीने होत नाही. म्हणून त्यांना काही आठवड्यांपूर्वी पेसमेकर बसवण्यात आला. (प्रतिनिधी)पहिल्यांदा हृदयाची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया करणे अधिक कठीण असते. कारण, एकदा हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर अवयव जोडले जातात. पाचव्या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयात घसरलेली झडप काढण्यात आली. जुन्या झडपेच्या जागी नवीन झडप बसवण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या ४० वर्षांत हृदयविकारांत चौपट वाढ झाली आहे. - डॉ. रमाकांत पांडा, हृदयविकार शल्यचिकित्सक
हृदयाच्या झडपांसाठी पाच वेळा शस्त्रक्रिया
By admin | Published: March 27, 2016 1:37 AM