मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मुंबईत लोकल सेवा सर्वांसाठी सुरु होण्याची तयारी करण्यात येत होती. परंतू मुंबई महापौरांनी नुकताच इशारा दिलेला असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनीदेखील नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे. (Rajesh Tope Talk on Corona vaccine )
लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. प्रतिबंधक नियमांचं कठोरपणे पालन करायला हवं. लॉकडाऊनमुळे खूप आर्थिक नुकसान होते, असे टोपे यांनी सांगितले.
लोकल सुरू केल्यानं रुग्ण वाढले का? याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की कसंय सारंकाही सुरू केलं की रुग्ण संख्या वाढणार हे आपण गृहीत धरुन असतो. मुंबईची लोकल हा सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे आणि गेल्या वर्षभरापासून लोकल बंद होती. त्यानं सर्वसामान्य नागरिकांचेच मोठे नुकसान होते. त्यामुळे लोकलबाबतही नीट विचार करुनच निर्णय घेतला जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.
तसेच कोरोनाची लस केव्हा घेणार? असा प्रश्न विचारला असता त्यांनी पंतप्रधानांनी परवानगी दिली की लगेच घेईन, असे उत्तर दिले. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. लाॅकडाऊनचा निर्णय अद्याप तरी घेतलेला नाही, असे सांगत नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.