अकोला: कार्तिक जोशी हत्याकांडातील १३ आरोपींची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; परंतु यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले नसल्याने हत्याकांडातील आरोपींची शरणागती रखडली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये न्यायालयाचे आदेश जिल्हा न्यायालयात पोहोचले, तर आरोपी न्यायालयाला शरण येण्याची शक्यता आहे. कार्तिक जोशी हत्याकांडातील आरोपी मनसेचे नगरसेवक राजेश काळे, बजरंग नागे, राहुल ठाकूर, संजय चव्हाण, विकी पटोने, मंगेश गमे, शेखर शर्मा, नितीन चाळसे, जय पटोने, नितीन संकट, संदीप चरण खोडे, राहुल ठाकूर, सागर घनबहादूर, राकेश खोडे या १३ आरोपींना जुने शहर पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला होता. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी संदीप मदनलाल जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ८ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठाने जामीन देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपींनी सात दिवसांमध्ये शरण येण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयानेही नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवत आरोपींची याचिका फेटाळली. यावेळी सरकारकडून ॲड. मायी यांनी युक्तिवाद केला, तर तक्रारकर्त्यातर्फे संदीप जोशींची बाजू ॲड. दिव्यांक मोहता, ॲड. शशांक देशपांडे आणि ॲड. सत्यनारायण जोशी यांनी मांडली. याचिका फेटाळल्यानंतरचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अद्यापपर्यंत जिल्हा न्यायालयात प्राप्त झाला नसल्याने आरोपी न्यायालयाला शरण गेले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदेश प्राप्त होताच सर्व आरोपी न्यायालयाला शरण येण्याची शक्यता आहे. २२ मेपर्यंत सवार्ेच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले तर आरोपींना न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. नजर घटनेवर... राम नगरातील युवा सेनेचा कार्यकर्ता असलेल्या कार्तिक जोशीवर २१ मे २०१३ रोजी पूर्ववैमनस्त्यातून वाशिम बायपास रोडवरील गीता नगर परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी कार्तिकची मोटारसायकलही पेटवून दिली होती. गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा २५ मे रोजी मृत्यू झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाअभावी रखडली आरोपींची शरणागती
By admin | Published: May 13, 2014 10:01 PM