गडचिरोली - अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोेली पोलिसांसमोर मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे. या महिला नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. या दोघींवर सहा लाख रूपयांचे बक्षीस होते. जया ऊर्फ शांती मासू मट्टामी (२४) ही डिसेंबर २०१२ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर रूजू झाली. मे २०१३ मध्ये भामरागड दलममधून तिची बदली प्लाटून क्र. १४ मध्ये झाली. ६ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या पोलीस व नक्षलवादी चकमकीनंतर वरिष्ठ माओवाद्यांच्या उपस्थितीत तोंडर जंगल परिसरात नक्षल्यांची मिटींग झाली होती. यावेळी जया मट्टामीची प्लाटून क्र. १४ च्या उपकमांडर पदावर नेमणूक करण्यात आली. तिच्यावर ११ खुनाचे गुन्हे, जाळपोळीचे सहा गुन्हे तसेच नैनेर चकमक, बेजुरपल्ली चकमक, नयगुंडा फाटा चकमक, दोडगेर चकमक यासारख्या १२ चकमकीमध्ये सहभाग होता. ती एकूण २९ गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. तिच्यावर चार लाख रूपयांचे बक्षीस होते. रनिता ऊर्फ सुनीता नामदेव कोडापे (१८) ही डिसेंबर २०१३ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर रूजू झाली. फेब्रुवारी २०१६ पासून ती सिरोंचा दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर आठ खुनाचे गुन्हे, चार जाळपोळीचे गुन्हे त्याचबरोबर गुरजा चकमक, नयगुंडा फाटा चकमक, कल्लेड चकमक अशा एकूण ११ चकमकीमध्ये तिचा सहभाग होता. तिने एकूण २३ गुन्हे केले आहेत. रनिता ही १३ वर्षांची असताना माओवाद्यांनी तिला नक्षल चळवळीमध्ये जबरदस्तीने सहभागी करून घेतले. यावरून नक्षलवादी संविधान व लोकशाही यांच्या विरोधात जाऊन अनेक निष्पाप आदिवासींना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून दूर ठेवत असल्याचे दिसून येत आहे. जया ही प्लाटून क्र. १४ ची उपकमांडर होती. नक्षल चळवळीला त्रस्त होऊन उपकमांडरने आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे तिच्या अखत्यारित असलेले इतरही नक्षलवादी आत्मसमर्पण करतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
दोन जहाल महिला नक्षलींचे गडचिरोलीत आत्मसमर्पण, दोघींवर सहा लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 6:32 PM