गडचिरोली : येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी आत्मसमर्पण केलेल्या ५६ नक्षलवाद्यांनी ‘गांधी शांती विचार’ परीक्षा दिली आणि सर्व जण त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांचे वैचारिकदृष्ट्या परिवर्तन होऊन त्यांनी कायमस्वरूपी शांतीचा मार्ग अवलंबावा, या उद्देशाने पुणे येथील आदर्श मित्र मंडळ, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा घेण्यात आली.मानवी जीवन उन्नत करणाऱ्या अहिंसेच्या मार्गावरून वाटचाल करावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. संस्कारक्षम वयातच नक्षलवादी युवकांना नक्षल चळवळीमध्ये घेऊन जातात. त्यानंतर त्यांच्यावर सातत्याने माओवादी व हिंसावादी विचारसरणीचा मारा केला जातो. आत्मसमर्पणानंतरही जुने विचार पुन्हा कधी उफाळून येतील, हे सांगता येत नाही. हिंसेंचा विचार त्यांच्या मनातून कायमचा पुसला जावा आणि त्यांनी मानवी जीवन उन्नत करणाऱ्या अहिंसेच्या मार्गावरुन वाटचाल करावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. जिल्हाभरातील सुमारे ५६ आत्मसमर्पितांनी ही परीक्षा दिली. परीक्षेपूर्वी त्यांना महात्मा गांधींच्या शांतीची पुस्तके अभ्यासासाठी देण्यात आली. त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या विचारासंदर्भात त्यांना आठवडाभर मार्गदर्शनही करण्यात आले. ८० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका त्यांना देण्यात आली. या परीक्षेमध्ये जानो सैनू हेडो ही प्रथम आली असून तिला ८० पैकी ७९ गुण मिळाले. साईनाथ पेंदाम याला ८० पैकी ७८ गुण मिळाले असून तो दुसरा आला आहे. तर आशा हिचामी हिला ८० पैकी ७५ गुण मिळाले असून ती तृतीय आली आहे. उत्तीर्ण झालेल्यांना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप व लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे श्रीनिवास सुंचूवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
आत्मसमर्पित नक्षलवादी पास झाले
By admin | Published: August 13, 2016 2:59 AM