Sculptor Jaydeep Apte Arrest : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी पोलिसांनी अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला. मालवण आणि कल्याण पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरु होता. त्यानंतर कल्याण पोलिसांनी आपटलेला त्याच्या घराखालून अटक केली. मात्र आता घाणेरड्या राजकारणामुळे मी पोलिसांना शरण आलो अशी माहिती शिल्पकार जयदीप आपटेने दिली.
सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. मालवण पोलिसांनी जयदीपला तिथल्या कोर्टात हजर केलं. त्यानंतर कोर्टाने जयदीपला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेनंतर शिल्पकार जयदीप आपटेने वकिलामार्फत आपलं म्हणणं मांडलं आहे. राज्यातील घाणेरड्या राजकारणाचा तिटकारा आल्यामुळे जयदीप आपटेने शरणागती पत्करल्याचे वकील गणेश सोवनी यांनी सांगितले.
"जयदीप आपटेविरोधात केलेले आरोप चुकीचे आहेत. बुधवारी आपटेने त्याच्या पत्नीशी चर्चा केली आणि त्यानंतर शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मात्र त्याला गुप्त माहितीच्या आधारे अटक केल्याचे सांगितले," असं जयदीपचे वकील गणेश सोवनी यांनी सांगितले.
"पुतळा कोसळल्यानंतर जनक्षोभ उसळलेला पाहून जयदीपवर नको असलेली कलमेही लावण्यात आली. पुतळा कोसळून जीवाला धोका निर्माण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पुतळा कोसळला तेव्हा कोणत्याही पर्यटकाला इजा झाली नाही. तसेच तज्ज्ञ समितीचा अहवाल येण्याआधीच घाईत जयदीपवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत," असेही वकील गणेश सोवनी यांनी म्हटलं.
दरम्यान, जयदीप आपटे हा कसाऱ्याहून लोकल ट्रेनने कल्याणमध्ये आला होता. त्यानंतर रिक्षाने तो दूध नाका परिसरात आला. त्याने डोक्यावर टोपी घातली होती आणि चेहऱ्यावर मास्क घातला होता. जयदीप इमारतीच्या गेटपर्यंत पोहोचला तेव्हा खाली पोलीस होते. पोलिसांनी जयदीपला ओळखले आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला गाडीत बसवले आणि पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.