लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बेघरांना घर मिळावे यासाठी अलिबाग नगरपालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. योजनेची नागरिकांना माहिती मिळावी यासाठी प्रभागांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत. नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, यासाठी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन नगरसेवक उमेश पवार यांनी केले.नगरसेवक उमेश पवार यांनी यामध्ये पुढाकार घेत प्रथम सभा बोलावून नागरिकांना योजनेची माहिती दिली. तांत्रिक सल्लागार म्हणून सरकारने चेतन सोनार यांची नेमणूक केली आहे. त्यांची टीम शहरामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहे, तसेच योजना समजावून सांगून नागरिकांच्या शंकांचेही निरसन त्यांच्यामार्फत केले जात आहे. राज्यातील १७ ठिकाणचे काम त्यांना देण्यात आलेले आहे. सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास आराखडा सरकारला सादर केला जाणार आहे. तो मंजूर झाल्यावर योजना मूर्तरूप घेणार आहे. गृह प्रकल्प उभारण्यासाठी नगरपालिकेमार्फत ठेकेदाराची निवड केली जाणार आहे. आम्ही त्यावर देखरेख करण्याचे काम करणार असल्याचे तांत्रिक सल्लागार चेतन सोनार यांचे सहायक संदीप बारी यांनी सांगितले.झोपडपट्टी परिसरातील नागरिक २००० च्या पूर्वीपासून आजपर्यंत सरकारी जागेतील झोपडपट्टी आणि आरक्षण नसलेल्या जागेवर अतिक्रमण करून राहणारे कुटुंब, शहरात विविध भागांमध्ये राहणारे, बेघर असलेले, भाडेकरू अथवा राहण्यास अयोग्य तसेच खासगी जागेवर राहणारे कुटुंब, आरक्षण नसलेल्या स्वमालकीच्या किंवा पक्क्या घरात राहणारे कुटुंब, स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घरकूल बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यास उत्सुक असलेले कुटुंब या योजनेस पात्र असल्याचे संदीप बारी यांनी सांगितले. या घटकातील लाभार्थ्यांना कमाल ३२२ चौरस फूट चटई क्षेत्रापर्यंत बांधकाम मिळणार आहे. अनुदानाची ही रक्कम सरकारला परत करावी लागणार नाही, असे बारी यांनी सांगितले. नगरपालिकेकडील जागेमध्ये पाच मजली इमारत उभारून तेथे घरकूल योजना उभारण्यात येणार आहे. अडीच लाख रुपयांमध्ये घर होणार नसल्याने बांधकामासाठी लागणारी अधिकची सुमारे साडेतीन लाख रुपयांची रक्कम लाभार्थ्यांना कर्ज स्वरूपात मिळणार आहे. कर्जाची रक्कमही १५ वर्षांमध्ये फेडायची असल्याचे नगरपालिकेचे रमेश धरणीये यांनी सांगितले.पंतप्रधान आवास योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक उमेश पवार यांनी केले. नागरिकांना कोणतीही मदत लागल्यास ती करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नागेश कुलकर्णी, उमाजी केळुसकर आदी उपस्थित होते.योजनेसाठी आवश्यक कागदपत्रेकुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, नगरपालिकेत भरत असलेल्या कराच्या पावत्या, घराचे लाइट बिल, राष्ट्रीयकृत बँकेचे स्वत:च्या नावाचे पासबुक, मतदान ओळखपत्र, रेशनिंग कार्ड, पती-पत्नीचे पासपोर्ट साईज फोटो, लाभार्थ्यांच्या राहत्या घराचा कुटुंबासोबत फोटो, स्वत:च्या मालकीची जागा असल्यास त्यांची कागदपत्रे, उतारे-नकाशे.
अलिबाग नगरपालिकेचे सर्वेक्षण सुरू
By admin | Published: July 11, 2017 3:39 AM