उस्मानाबाद : दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी राष्ट्रीय महामार्गालगत शेतातील पलंगावर ठेवलेल्या धान्याची पाहणी केली़ त्यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उभी ज्वारी पायदळी तुडविल्याने शेतकऱ्याचेच नुकसान झाले़ वडगाव (सि) येथे लावण्यात आलेल्या स्टॉलवर राज्यपाल गेल्यानंतर केवळ विद्यार्थी, मास्तर अन् कर्मचारीच उपस्थित असल्याचे दिसून आले़ राज्यपालांचा दौरा निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ वडगाव, यमगरवाडी व तुळजापूर या तीन ठिकाणी राज्यपालांच्या भेटी निश्चित करण्यात आल्या़ सकाळी पावणे अकराच्या सुमारास नियोजित वेळेनुसार राज्यपालांचे वडगावमध्ये आगमन झाले़ त्यांनी आजींबर मोरे यांच्या शेतातील पलंगावर ठेवलेल्या सोयाबीन काडासह इतर पिकांची पाहणी केली़ सोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफाही शेतात घुसल्याने मोरे यांच्या ज्वारीचे नुकसान झाले़ या पाहणीनंतर राव यांचे वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रमस्थळी आगमन झाले़ त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसह येथे आल्याचे सांगत तुमच्या व्यथा सांगा, असे आवाहन केले़ काही शेतकरी वजा पुढाऱ्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या़ यावेळी समाधान योजनेंतर्गत काही ग्रामस्थांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले़ राज्यपालांचा कार्यक्रम झाल्यानंतर अनेक अधिकारी तुळजापूर, यमगरवाडीकडे रवाना झाले़ शेतकरी, वडगाव ग्रामस्थांनीही आपापले काम करण्यास पसंती दिली़ समाधान योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये नंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी फेरफटका मारून पाहणी केली़ अनेक स्टॉलमध्ये कर्मचारी निवांत बसून होते़ (प्रतिनिधी)शेतकरीही हवालदिलशेतकरी आरजींबा मोरे यांच्या शेतात राज्यपालांनी पाहणी केली़ या मोरे कुटुंबास सात एकर शेती आहे़ या शेतीत ३२०० रुपये किलोचे कांद्याचे बियाणे आणून पेरणी केली होती़ मात्र उत्पन्नातील ४० कट्ट्यांची ६००० रुपये पट्टी आली आहे़ यावेळी शेतकरी बालाजी मोरे हे राज्यपाल राव यांना शेतातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी गेले होते़ मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना राव यांच्याशी चर्चा करण्याची संधीच दिली नाही़
महामार्गाच्या कडेकडेने ‘पाहणी’
By admin | Published: January 06, 2015 2:14 AM