मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे-पवार एकत्र आले. मात्र अडीच वर्षात उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निसटला आहे. राज्यातील या खेळीमागे भाजपाचा हात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत आहेत. त्यातच एका सर्व्हेतूनही हेच चित्र समोर आले आहे.
राज्यात आज निवडणूक झाली तर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी विरोधी महाविकास आघाडीला ४८ पैकी २६ जागा मिळतील असा अंदाज आहे. परंतु या काँग्रेसला १२ आणि उद्धव ठाकरे-शरद पवार या दोघांना मिळून १४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मूड ऑफ द नेशन या कार्यक्रमातंर्गत आजतक वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारले. याला शिवसेनेतील ४० हून अधिक आमदारांनी साथ दिली. तर पक्षाचे १८ पैकी १३ खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेले. निवडणूक आयोगानेही शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यानंतर राष्ट्रवादीबाबतही तेच घडले. शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षाच्या दिग्गज आमदारांसोबत वेगळी भूमिका घेत सत्तेत सहभागी झाले.
शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे बहुतांश नेते आणि पक्षाचे ४० पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत सत्तेत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला. परंतु नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाची असा निर्णय दिला. त्याचसोबत घड्याळ चिन्हही त्यांना सुपूर्द केले. या घडामोडीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष निसटल्याने त्यांना सहानुभूती मिळेल अशी चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. मूड ऑफ नेशनमधूनही तेच होत असल्याचे दिसते.
२०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे १८ खासदार जिंकले होते. त्यावेळी ते भाजपासोबत युतीत लढत होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ खासदार जिंकले होते. त्यामुळे २०२४ मध्ये ठाकरे-पवार यांना किती खासदारांना निवडून आणता येतंय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यात या सर्व्हेतून या दोघांना १४ खासदार निवडून येतील असं दाखवले आहे. त्यामुळे दोन्ही गटाला फायदा होताना दिसत आहे.