मुंबई : राज्यात अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले असून, हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून राज्यातील विविध नवनिर्वाचित आमदार आप-आपल्या मतदारसंघात दौरे करताना पाहायला मिळत आहे. तर झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे मागणी सुद्धा या आमदारांकडून करण्यात आली आहे.
राज्यात सत्तासंघर्षाचे राजकरण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना पाहायला मिळत आहे.
ज्या भागात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. जवळपास त्या भागातील सर्वच आमदार शेतकऱ्याच्या मदतीला धावून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्ष पाहता सरकार स्थापनेपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. मात्र आमदारांच्या रेट्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनाम्याला सुरवात केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.