पालघर : सोमवारपासून ९ दिवस श्रमजीवी संघटनेचे विशेष पथक पालघर जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, आश्रमशाळा, रोहयो इत्यादी विभागांचा पाहणी दौरा करणार आहे. जिल्ह्यातील कुपोषण, आरोग्य, रोजगार आणि आश्रमशाळांची दुरावस्था यांच्या सुधारणांबाबत बाबत प्रभावी कृती आराखडा तयार करण्याची ही तयारी आल्याचे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. या पाहणी दौऱ्यात असलेले पाच पथक प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहणी करणार आहेत. आतापर्यंत होत असलेल्या उपाययोजना या फक्त तात्पुरता मलमपट्टी असल्याचे दिसत आहे. कुपोषणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर कुपोषणाशी संबंधित असलेले रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि स्थलांतराचे प्रश्न सुटायला हवेत. त्या साठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर द्यायला हवा असे स्पष्ट मत पंडित यांनी व्यक्त केले. परवा मुख्यमंत्री निवासस्थान ‘‘वर्षा’’ येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कुपोषण आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रश्नावर वस्तुनिष्ठ कृती आराखडा तयार करण्याची विनंती पंडित यांना केली होती. याच पार्श्वभूमिवर हा पाहणी दौरा असेल. प्रत्येक विभागाची वस्तुस्थिती, तिथल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न हे पथक करणार आहे. (प्रतिनिधी)>मोखाड्यापासून सुरुवात सोमवार (दि.१७) पासून मोखाडा तालुक्यातून या दौऱ्याला सुरुवात होईल. सलग ९ दिवस हा पाहणी दौरा सुरु राहणार असल्याचे माहिती श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी दिली.
जिल्ह्यात श्रमजीवी करणार पाहणी दौरा
By admin | Published: October 17, 2016 2:52 AM