मुंबई - शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजून एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर नारायण राणेंनी सुरू केलेल्या बदनामीविरोधात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना दिली होती. तसेच त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, मात्र नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि याबाबतची बोलणी थांबली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, नारायण राणे यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे आमच्यासारखी लोकं जी शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबावर प्रेम करतात ती दुखावली गेली होती. मी या संदर्भात भाजपाच्या नेत्यांकडे विचारणा केली होती. तुम्ही तुमचं व्यासपीठ अशा गोष्टींसाठी कसा वापरू देता? त्यावेळी त्या भाजपा नेत्यांनी सांगितलं होतं की आमच्या बहुतांश आमदारांचा अशा बदनामीला विरोध आहे. माझ्या मते राजकीय भवितव्य असलेल्या एखाद्या युवकाची बदनामी झाली तर ते योग्य ठरणार नाही. आपल्या घरातील तरुणाची, एखाद्या व्यक्तीची बदनामी होते, तेव्हा कुटुंबाला किती वेदना होतात, हे मी समजून शकतो. त्यामुळे कुणीही न सांगता मी स्वत: वैयक्तिक संपर्कातून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कानी ही गोष्ट घातली. मोदी अत्यंत कर्तव्यकठोर व्यक्ती आहेत. त्यांनी ही माहिती व्यवस्थित ऐकून घेतली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नारायण राणेंनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. त्यातून आदित्य ठाकरेंची जी बदनामी झाली त्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. त्यामुळे मी पुढाकार घेतला, असे केसरकरांनी सांगितले.
केसरकर पुढे म्हणाले की, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा संवाद सुरू झाला. हे मुद्दे जसेच्या तसे आम्ही पोहोचवत होतो. त्यामुळे पुढच्या काळात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट झाली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा, हे दाखवून दिले. त्यांच्या निरोपामधून बाळासाहेबांबद्दलचा आदर, ठाकरे कुटुंबावरील प्रेम दिसून येतं होतं. त्यावेळीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्याचं ठरवलं होतं. १५ दिवसांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद सोडणार होते. परंतु उद्धव ठाकरे मुंबईत आले तेव्हा या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. अन्यथा गैरसमज निर्माण होतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी वेळ मागून घेतला होता. यादरम्यान जी बोलणी होत होती त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या मनात जे जे आहे त्यानुसार करण्याची तयारी मोदींनी केली होती. हे सर्व निरोप देत असताना केवळ तीन लोकांना माहिती होती. याची कल्पना रश्मी वहिनींनाही होती. काही खोटं बोलून कुणाची बदनामी करण्याची गरज नाही. मी जे घडलं, जसं घडलं हे महाराष्ट्रासमोर आणत आहे, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.
याचदरम्यान बराच वेळ निघून गेला आणि विधानसभेत १२ आमदारांच निलंबन झालं. निलंबन झालं तेव्हा भाजपाचा निरोप आला होता. आपली बोलणी होत असताना अशा प्रकारे आणि एवढ्या वेळासाठी निलंबन करणं योग्य नाही, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर कोर्टानेही हे निलंबन रद्द ठरवलं. त्यानंतरच्या काळात नारायण राणेंचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आणि ही बोलणी थांबली. मग दोन महिन्यांनी माझं पुन्हा उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यात अशा गोष्टी होतच असतात. मात्र पुन्हा बोलणी सुरू होऊन चांगलं निष्पन्न व्हावं, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे हे बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून मी प्रयत्न सुरू केले. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनाही, याबाबत कल्पना दिली होती, असा दावाही दीपक केसरकर यांनी केला.