मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणारे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्यामागे भाजप असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे केला. तसेच, गेले तीन महिने सोशल मीडियात या प्रकरणी बदनामी करणाऱ्यांची चौकशी सायबर सेल आणि गुन्हे शाखेमार्फत केली जाईल, असे त्यांनी येथे पत्र परिषदेत सांगितले.सुशांतसिंह प्रकरणी महाराष्ट्र व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची सुपारी एका राजकीय पक्षाने घेतली होती. महाराष्ट्रात राहणारी, पण दुसºया राज्याची असलेल्या कठपुतलीचा वापर त्यासाठी केला. राज्य कोरोनाविरुद्ध लढत असताना हे षड्यंत्र सुरू होते. भाजप या षड्यंत्रामागे होता. ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी केली त्यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असा हल्लाबोल देशमुख यांनी केला.बिहारचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे आता बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जदयुतर्फे विधानसभा निवडणूक लढत असून, तेथे भाजपचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस हे पांडे यांच्या प्रचाराला जाणार का, असा सवालही देशमुख यांनी केला.सुशांत प्रकरणात एम्स, कूपर हॉस्पिटलचा अहवाल आला आहे. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचे दिसते. सीबीआयने अहवाल लवकर द्यावा म्हणजे सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हे स्पष्ट होईल, असेही देशमुख म्हणाले.सुशांत प्रकरणात अजून सीबीआयचा अहवाल आलेला नाही. एम्सने अहवालाबाबत सीबीआयला विचारावे, असे स्पष्ट केले आहे. तरीही अनिल देशमुखांना प्रतिक्रिया देण्याची घाई का? बाळंतपण झालेले नसतानाच बाळाला पाळण्यात घालून नाव ठेवण्यासारखा प्रकार ते का करीत आहेत? सरकार ड्रग्ज माफियांना पाठीशी घालत आहे का? - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेता, विधान परिषद
Sushant Singh Rajput Case: पोलिसांच्या बदनामीमागे भाजप; गृहमंत्री देशमुख यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 2:55 AM