दोन वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेला भाजपानं पक्ष प्रवेशाची ऑफर दिली. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस असल्याने ते शक्य नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात केला आहे.
ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो. जिथं आमचं बालपण, तारुण्य गेले. आता ८३ वर्षाचा आहे. आता दुसऱ्याच्या घरात कसं जाणार? हे शक्य नाही. प्रणितीही अशा पक्षबदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही. राजकारणात असं होत राहते, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. सुशीलकुमार शिंदेंच्या या विधानावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की, भाजपाने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेला ऑफर दिली नाही. भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. तसेच आमच्य पक्षाला तशी गरज नाही, पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे. कोणाला भाजपात यायचं असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांना दोनदा ऑफर दिली परंतु ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत. प्रणितीही कुठे जाणार नाही याची मला खात्री आहे. पण भाजपाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. प्रशासकीय कामावर भाजपाला विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास नसल्याने इतर पक्षातील नेत्यांना भाजपासोबत घेतेय. एकनाथ शिंदे, अजित पवारांना घेतले आणि काँग्रेस नेत्यांना घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु आता भाजपाचा पराभव दिसत असताना कुणीही त्यांच्यासोबत जायला तयार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.