सोलापूर : वृत्तपत्र टाकणारे ए. पी. जे. अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती होऊ शकतात. लहानपणी रेल्वेत चहा विकणारे पुढे पंतप्रधान होतात. न्यायालयात पट्टेवाला म्हणून काम करणारे सुशीलकुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री बनतात. भारतीय लोकशाहीचे हे सर्वांत मोठे यश आहे. लोकशाही ही सर्वांना न्याय देते, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.सोलापूर विद्यापीठाच्या विशेष दीक्षान्त समारंभात राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांना डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार आदी उपस्थित होते.सुशीलकुमार शिंदे यांचा जीवनप्रवास भावी पिढीला हे आदर्शवत असल्याचे राव म्हणाले.सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले, २००४ साली मुख्यमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित असणाऱ्या या विद्यापीठाचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला. गुणवत्ता वाढवायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ हवे. सोलापूर विद्यापीठाने चांगली प्रगती केली. आधुनिक भारताच्या जडणघडणीत सोलापूर विद्यापीठाचे नाव नक्कीच असेल. (प्रतिनिधी)
सुशीलकुमार भावी पिढीला आदर्शवत व्यक्तिमत्त्व
By admin | Published: April 27, 2017 1:41 AM