राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुुशीलकुमार शिंदे हे डावे की उजवे अशी चर्चा सोलापुरात रंगलीयं. ही चर्चा निवडणूक निकाल किंवा विचारसरणीबद्दल नव्हे तर मतदानानंतर शिंदे यांनी दाखविलेल्या उजव्या हाताबद्दल आहे.
सोलापूर लोकसभेसाठी गुरूवारी मतदान झालं. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी कुटुंबियांसह विजापूररोडवरील नेहरूनगर येथील जागृती विद्यामंदिर शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. सकाळी ६.५0 वा. मतदान केंद्रावर ते पोहचले. मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मशीन बसविणे व पोलिंग एजंटच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यास थोडा उशीर झाला. त्यानंतर पहिलं मतदान शिंदे यांनी नोंदविलं. मतदान केंद्रावर जाताना कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होती. पण शिंदे यांनी प्रोटोकॉलप्रमाणे रांगेत पहिला मान घेऊन मतदार यादीतील नाव तपासणीसासमोर गेले. गडबडीत त्यांना मतदान ओळखपत्र सापडेना. एवढ्या घाईतही त्यांनी ओळखपत्र शोधून मतदान केंद्र अधिकाऱ्यास दाखवलं. या धांदलीत मतदान केंद्रावरील कर्मचारी गडबडले. शाई लावतांना शिंदे यांनी उजवा हात पुढे केला. कर्मचाऱ्यानेही गडबडीत उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली. या सोपस्करानंतर शिंदे यांनी या केंद्रावरील पहिलं मतदान केलं.
त्यानंतर पत्नी उज्ज्वला व मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदान केलं. आमदार प्रणिती शिंदे यांनी बॅलेट मशीनवर बटन दाबल्यावर व्हीव्हीपॅट मशीन पाहिले. या मशीनमध्ये होणारा खडखडाट पाहून त्यांनी आवाजाबद्दल मतदान केंद्राधिकाऱ्यांपुढे शंका व्यक्त केली. मोठा आवाज येतोय, मशीन चेक करा अशी सूचना करून त्या मतदान केंद्राबाहेर पडल्या. मतदान नोंदविल्यानंतर शिंदे कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी मतदान केल्याची खूण पटविण्यासाठी चुकून उजवा हात उंचावला. विशेष म्हणजे यावेळी पत्नी उज्वला व मुलगी आमदार प्रणीती शिंदे यांनी डावा हात दाखविला.
उजव्या हाताची चर्चासुशीलकुमार शिंदे यांचा मतदानानंतरचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला कशी शाई लावली ते उमेदवार आहेत म्हणून हा नियम आहे काय अशा शंकाही लोकांनी उपस्थित केल्या. त्यामुळे मतदान करताना बोटाला शाई लावण्याचा नियम काय आहे याबाबत शहर मध्य विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याशी चर्चा केल्यावर नियमाने डाव्या हाताच्या बोटालाच शाई लावली जाते.
अपवादात्मक परिस्थितीत जर डाव्या हाताला बोट नसेल किंवा जखम असेल तर उजव्या हाताच्या बोटाला शाई लावता येते. हा नियम असला तरी शिंदे यांच्याबाबतीत नेमके काय घेतले याचा शोध घेतल्यावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, अॅड. यु. एन. बेरिया यांनी यावेळी काय गडबड झाली हे माहित नाही, आम्ही त्यावेळी नव्हतो असे संगितले. पण मतदान करताना शिंदे यांच्याबरोबर असलेल्या लोकांकडे चौकशी केल्यावर निवडणूक कर्मचाºयाच्या चुकीने उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली गेल्याचे निष्पन्न झाले.