Sushma Andhare News:राज ठाकरे यांच्या व्याख्यानाचा काही परिणाम होणार नाही. ज्या अर्थी एवढे सगळे लोक एका ८४ वर्षांच्या व्यक्तीला आणि एका अत्यंत घायाळ वाघाला हरवण्यासाठी एवढे सगळे ताकद लावतात, त्या अर्थी आपण जिंकू शकतो, याचा विश्वास त्यांना राहिलेला नाही. महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाही. राज ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका महाराष्ट्रातील जनतेला पटणारी नाही, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांच्या निर्णयावर महाविकास आघाडी आणि महायुतीतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
राज ठाकरेंची भूमिका जनतेला पटणारी नाही, आपण जिंकणार ही त्यांना खात्री नाही
एकीकडे राजकीय व्यभिचाराला समर्थन नाही, असे म्हणताना तुम्ही ज्यांनी वाया सुरत-गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचे राजकारण करत इथे सरकार बदलले, अशांना पाठिंबा देता. एकीकडे तुम्ही विचारांची भाषा करता आणि दुसरीकडे विचार बदलून टाकता. महाराष्ट्रातील जनता, जो कोणी संविधान प्रेमी आहे, त्याला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा एकूण भाजपातील लोक असतील, हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे, त्यांचा जो मूळ पिंड आहे, तो दाखवत आहेत. त्यांचा जिथे स्टेटमेंट आहे, सभेमध्ये त्यांनी केलेले हे वक्तव्य हे भाजपाच्या मूळ संस्कृतीचे खरे प्रदर्शन आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला.