राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपासोबत सत्तेत सहभागी होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते आता मुख्यमंत्री होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणाच्या कारणामागेही हीच चर्चा होत होती. आता पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार सोबत आले नाहीत तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, अशी अट मोदींनी अजित पवारांना घातली आहे, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याच दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होणार का? यावर भाष्य केलं आहे. शिंदे कधी जातील आणि अजितदादा सीएम होतील हे कळणारही नाही असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्र्यांच्या war room ला अजित दादांचा नियंत्रण कक्ष नियंत्रित करत आहे. यावरूनच महाराष्ट्राचे राजकारण BJP कोणत्या दिशेला नेत आहे हे जाणकारांनी समजून घ्यावे" असं सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"शरद पवार आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल"
"शरद पवार आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल अन्यथा तुम्हाला सीएम पदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणूनच पवारांना सोबत चला असा त्यांचा आग्रह असू शकेल. त्यातून त्यांची भेट घेऊन दया याचना करत असतील असे म्हणालायला हरकत नाही" असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवारांच्या विधानावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी भूमिका मांडली. तसेच, या विधानात कुसलेही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
"आमच्या निर्णयामुळे काहींना मोठं दु:ख झालंय"
अजित पवार आणि मुख्यमंत्रीपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेस नेते असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे काहीजण असतील, यांची विधाने ही संकुचित प्रवृत्तीची लक्षणं आहे, भाजपासोबत जाताना अशी कुठलीही अट ना आम्ही ठेवली, किंवा भाजपाकडून तसा कुठलाही प्रस्ताव आमच्यासमोर ठेवण्यात आला नाही. केवळ, महाराष्ट्राच्या गतीमान विकासासाठी आणि देशाला कणखर नेतृत्व मिळावे, यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचं सुनिल तटकरे यांनी सांगितले. आमच्या निर्णयामुळे काहींना मोठं दु:ख झालंय. त्यामुळे, ते अशी विधानं करत आहेत, असेही तटकरे यांनी म्हटले.