Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळाले आहे. शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू आणि भाजप समर्थक रवी राणा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. रवी राणा यांनी शब्द मागे घेतल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही पहिली वेळ आहे म्हणून माफी देतो, असे सांगत हा वाद मिटल्याचे जाहीर केले. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार रवी राणा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रवी राणा यांची आमदारकी रद्द करण्याचा ठराव विधानसभेत मांडला पाहिजे. फक्त माफीने काम चालणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी असा समज होईल की, तुमचे पडद्यामागून वेगळे कारस्थान सुरु आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
रवी राणा बच्चू कडूंचा अशाप्रकारे अपमान करु शकत नाहीत
रवी राणा यांनी नुसती माघार घेऊन कसे चालेल. मला वाईट वाटते, बच्चू कडू आमचा भाऊ आहे. रवी राणा त्यांचा अशाप्रकारे अपमान करु शकत नाहीत. रवी राणा यांनी अक्षम्य चूक केलेली आहे. तुम्ही एका मान्यताप्राप्त लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करता, त्याच्या प्रतिमेला आणि विश्वासर्हतेला तडा जाईल, अशी विधाने करता. त्यामुळे अशी सवंग, उथळ आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सदस्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्याची जबाबदारी राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
दरम्यान, सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू आहे. यासाठीच देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. मात्र, मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळे करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, याच वाईट वाटत आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"