Maharashtra Political Crisis: गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानंतर मोठे भगदाड शिवसेनेला पडले आहे. मात्र, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असून, भाजपवाले पडद्यामागून मदत करत असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता मनसेनेही उडी घेतली आहे. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे, नारायण राणे आणि राणा दाम्पत्यावर अतिशय बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात आहे. त्यात दसरा मेळावा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात आता मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना दसऱ्याच्या दिवशी जनतेला संबोधित करावे, अशी गळ घालण्यात येत आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत
कोणत्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबाबत अभिमान वाटणे सहज स्वाभाविक आहे. आपल्या नेत्यामध्ये चांगले गुण आहे, ते नेतृत्व करण्यास सक्षम आहे, असे वाटणेही अत्यंत सहज सुलभ आहे. या न्यायाने मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याबाबत काही वाटत असेल. तर त्याबद्दल आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची सब कंत्राटे भाजपने काढली आहे. आणि ही सब कंत्राटे मिळवण्यासाठी अनेक नेते फार उतावीण पद्धतीने पुढे आलेले आहेत. नवनीत राणा, नारायण राणे आणि राज ठाकरे ही सगळी मंडळी कंत्राट मिळवण्यासाठी फार उत्सुक आहेत. आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की, मुख्यमंत्री पदावर नसतानाही उद्धव ठाकरेंमुळे राजकीय रोजगार हमी योजनेची कामे या सगळ्यांना मिळू शकत आहेत, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
परंपरा कुठेतरी खंडीत झाल्यासारखी वाटते
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, दसरा मेळाव्याला देशातील तमाम हिंदुला, महाराष्ट्रातील मराठी माणसांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सोने लुटले जायचे. २०१२ नंतर ही परंपरा कुठेतरी खंडीत झाल्यासारखी वाटते. दसरा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांचे विचार आणि मराठी माणसांचे विचार ही जनतेला सवय झाली होती. आज जो वाद सुरू आहे तो स्थळावरून आहे असा टोला मनसेने लगावला.
दरम्यान, ५६ वर्षांत शिवसेनेने असे ५६ लोक पाहिले. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुनावले. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून संभ्रम-बिंभ्रम अजिबात नाही. दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच (शिवाजी पार्क) होणार. तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक भाग आहे, ते बघूच. पण आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असे उद्धव ठाकरेंनी ठणकावले.