वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते. कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपा, शिंदे-फडणवीस सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोशारीजी. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती!" असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आणि नंतर आलेले महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात घेतलेल्या विविध राजकीय भूमिका, रखडवून ठेवलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती यामुळे भगतसिंह कोश्यारींवर टीका झाली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान, तसेच महात्मा फुलेंबाबत काढलेल्या उदगारांमुळे कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"