मुंबई : प्रदेश भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह 'भारत हे हिंदुराष्ट्र आहे' असे ट्विट केले आहे. यानंतर आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आले आहे. भारत हे एक हिंदू राष्ट्रच आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर विरोधी पक्षातील काही नेते भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे म्हणत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोकठोक भाष्य करत, भाजपला पक्षाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.
यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, "मी याकडे फार चांगल्या अर्थाने पाहते. मला वाटते, जर हे हिंदुराष्ट्र असेल, हे हिंदुराष्ट्रच मानायचे असेल आणि येथील बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि मुस्लीम देवेंद्रजींना वाऱ्यावर सोडून द्यायचे असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर असेच असेल, तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी बदलून हिंदुस्तान जनता पार्टी करावे."
काय होतं भाजपचं ट्विट? -"कोणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगुलचालन केलं तरी त्यांच्या मानन्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही! भारत हे हिंदुराष्ट्रच आहे," असे ट्विट काल प्रदेश भाजपच्या ट्विटर हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह करण्यात आले आहे. तत्पूर्वी, लखनऊ येथे माध्यमांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीही अशाच स्वरुपाची भूमिका मांडली होती.
...हिंदू राष्ट्राबद्दल काही भूमिका मांडली जात असेल तर ती चिंतेची बाब -भाजप नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल मांडण्यात आलेल्या भूमिकेबाबत माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. "जगात धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत नाही. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात सर्वांचे स्वागत केले जाते. त्यामुळे प्रगतीही त्या वेगाने होते. आपल्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यामुळे देशातील सर्व व्यवस्थेवर हिंदू धर्मातील विद्वानांचा प्रभाव आहे. अमेरीकेसारख्या देशात कोणत्याही जातीधर्माचा भेदभाव केला जात नसल्याने तो देश प्रगतीपथावर गेला. त्याच पद्धतीने भारताची प्रगती आपण सर्वांनी धर्मनिरपेक्ष विचाराने आजवर करत आलो आहोत. पण, राज्यकर्त्यांमधील काही प्रमुख नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल काही भूमिका मांडली जात असेल तर ती चिंतेची बाब आहे," असे म्हणत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.