ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १४ - लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपा नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्यावरून नाराजीचे चित्र दिसत आहे. देशात एनडीएचे सरकार आल्यास आपल्याला सन्मानपूर्व पद हवे असे सांगत नाराज असलेल्या सुषमा स्वराज यांनी मोदी यांच्या गांधीनगरच्या बैठकीकडे पाठ फिरवून भोपाळला जाणे पसंत केले. बुधवारी सांयकाळी होणा-या बैठकीला नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग, अरून जेटली, नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
विविध वृत्तवाहिन्यांनी एग्झिट पोलमध्ये आगामी सरकार हे एनडीएचे येणार असून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. एग्झिट पोल आल्यानंतर भाजपानेही त्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. देशात जर एनडीएचे सरकार आल्यास सरकारमध्ये आपल्याला सन्मानपूर्वक पद हवे अशी मागणी सुषमा स्वराज यांनी भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे बोलून दाखवली असल्याची माहिती आहे. मोदी यांनी बुधवारी गांधीनगर येथे महत्वाची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीची माहिती असूनही सुषमा स्वराज यांनी या बैठकीकडे पाठ फिरवून भोपाळला कार्यक्रम असल्याचे सांगून त्या भोपाळला निघून गेल्या आहेत. दरम्यान, आपण नाराज नसल्याची प्रतिक्रीया सुषमा स्वराज यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली आहे.