पुणे : इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मंगळवारी सायंकाळी अब्दुल रौफ या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. तो कर्नाटकातील भटकळ जिल्ह्यातील रहिवासी असून दुबईला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता.गेल्या काही दिवसांपासून अब्दुल रौफ आयसीस दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय होता. ई-मेलच्या माध्यामातून काही संशयितांशी तो संपर्क साधत होता. राष्ट्रीय तपास संस्थेसह गुप्तचर खाते (आयबी) त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. तो मंगळवारी सायंकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईला निघाल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे तपास यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.रौफ दुबईमार्ग सिरीयात जाऊन आयसीस या दहशतवादी संघटनेत भरती होणार असल्याची माहिती तपासयंत्रणांना मिळाल्याचे समजते. मात्र याबाबत सध्या कोणतेही भाष्य करणारे योग्य ठरणार नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. देशभरात दहशतवादी कारवाया करणारे रियाज भटकळ, इक्बाल भटकळ, यासीन भटकळ हे कर्नाटकातील भटकळ तालुक्यातीलच आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयसीस शी संबंधांच्या संशयावरून देशभरातून १४ तरूणांना अटक करण्यात आली होती. त्यात ठाणे आणि मुंबई परिसरातील तरूणांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
‘इसिस’चा एक संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2016 5:13 AM