लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवारच्या मध्यरात्री एकापाठोपाठ एक चार नवजात बालकांचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेच्या काही तासापूर्वी सुखरूप व धडधाकट असलेले हे शिशू अकस्मात दगावल्याने पालकांचा रोष उफाळून आला. परिणामी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मृत शिशुंपैकी तिघांच्या अंगावर लाल-काळे चट्टे आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.पीडीएमसी या खासगी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात या चारही शिशूंना दाखल करण्यात आले होते. दोन मातांची प्रसूती खासगी इस्पितळात, तर दोघींची पीडीएमसीतच झाली होती. पूजा आशिष घरडे (रा.व्यंकय्यापुरा), शिल्पा दिनेश विरूळकर (किरणनगर), माधुरी बंटी कावरे (राजहीलनगर), आफरीन बानो अब्दुल राजीक (चांदूरबाजार) अशी मातांची नावे आहेत. पूजा यांची तीन दिवसांची मुलगी, शिल्पा यांचा पाच दिवसांचा मुलगा तसेच माधुरी आणिआफरीन बानोच्या चार दिवसांच्या बाळांवर येथे ह्यइन्क्युबेटरह्णमध्ये उपचार सुरू होते. पालकांच्या मते चारही शिशूंची प्रकृती उत्तम होती. त्यांना रुग्णालयातून रविवारी घरी सोडले जाणार होते परंतु सुट्टीमुळे सोमवारी घरी सोडू, असे डॉक्टारांनी सांगितले होते. त्यापूर्वीच ही भयंकर घटना घडली. घटनेनंतर चारही मृत शिशूंची तपासणी केली असता आफरीन बानो हिचे बाळ ‘सेप्टिसिमिया’ नामक आजाराने दगावल्याचे स्पष्ट झाले. इतर तिघांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. घटनेनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी भूषण कट्टा यांनी वरिष्ठांना माहिती दिली. काही वेळातच अधिष्ठाता दिलीप जाणे घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी लगेच गाडगेनगर पोलिसांना पाचारण केले. तोवर मृत शिशूंचे पालकही रूग्णालयात पोहोचले होते. मुलांचा अकस्मात मृत्यू झालाच कसा, असा सवाल करीत नातलगांनी पीडीएमसीच्या आवारात तसेच ‘डीन’कक्षात धुमाकूळ घातला.तपासासाठी चौकशी समिती, शवविच्छेदनाचे चित्रीकरणचार नवजात शिशूंचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा ‘सेफ्टीसिमीया’ने मृत्यू झाला तर अन्य तिघांच्या मृत्युचे कारण अज्ञात आहे. तपासासाठी चौकशी समिती गठित केली असून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. - दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी. शिशूंच्या मृत्यूचे निश्चित कारण सध्या सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट होईल. शवविच्छेदनाचे चित्रिकरण केले आहे. पीडीएमसी प्रशासनाच्या चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल. - अरूण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती
अमरावतीमध्ये चार नवजात बालकांचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: May 30, 2017 3:53 AM