धुळे : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे गुरुवारी दुपारी धुळ्यात प्रचारासाठी आले असताना गोंदूर विमानतळावर त्यांच्या विमानातून संशयास्पद पांढऱ्या रंगाचा बॉक्स उतरविण्यात आल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी लोकसंग्रामचे उमेदवार आमदार अनिल गोटेयांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.आपण जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार केली असल्याची माहिती गोटे यांनी दिली. त्या बॉक्समध्ये १५ कोटी रुपये होते, अशी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावरून दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.धुळे शहर व मतदारसंघात चर्चा आहे की, भाजप उमेदवारासाठी फार मोठ्या प्रमाणावर पैसे आलेले आहेत. झालेला प्रकार संशयास्पद आहे. या सर्व प्रकाराला धुळे मतदारसंघातील जनता मतदानातून चोख उत्तर देईल, असे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले.भाजपने या आरोपांचा इन्कार केला आहे. प्रभू यांनी धुळ्यात राहणाºया बहिणीसाठी रत्नागिरीचे आंबे आणले होते. परंतु काँग्रेस व अपक्ष उमेदवार त्याचे भांडवल करीत असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु होऊ शकला नाही.
सुरेश प्रभू यांच्या विमानातून उतरविलेल्या बॉक्सवरुन संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 3:34 AM