औरंगाबाद : तरुणीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालणारा अन् पीडित तरुणी तक्रार करण्यास आल्यानंतर तिच्याशी अशालीन भाषेत संवाद साधणारा सिडको ठाण्यातील सहायक फौजदार हरीश खटावकर यास शनिवारी निलंबित करण्यात आले. तरुणाकडून होणाऱ्या छेडछाडीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हताश झालेल्या श्रुती कुलकर्णीने आत्महत्या केली. त्यानंतर शहरात जनक्षोभ उसळल्याने चार पोलिसांवर कारवाई झाली आहे. ठाणेप्रमुख असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी प्रकरण गांभीर्याने न हाताळल्याने त्यांचीही नियंत्रण कक्षात बदली झाली. पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी सहायक फौजदार राजू वैष्णव आणि जमादार एन. डी. हिवाळे यांना निलंबित केले होते. श्रुतीने स्वप्निल मिणियारच्या त्रासाला कंटाळून १७ आॅगस्टला विषारी गोळ्या सेवन केल्या़ त्यात २० आॅगस्टला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रुतीला सतत एसएमएस व फोन करून स्वप्निल त्रास देत होता. मात्र पोलिसांनी त्याच्या विरोधात २४ जुलैला किरकोळ गुन्हा नोंदविला होता. तक्रारीनंतर तपास अधिकाऱ्यांनी तब्बल १० दिवसांनी त्याला अटक केली आणि दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला. (प्रतिनिधी)
छेडछाडीकडे दुर्लक्ष करणारा सहायक फौजदार निलंबित
By admin | Published: August 23, 2015 5:13 AM