अतुल कुलकर्णी/ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 16 - जल विद्युत केंद्र पोफळी येथील मुख्य अभियंता पदावर कार्यरत असणाऱ्या व्ही.एम. खोकले या अधिकाऱ्यास अश्लील मेसेस पाठवला म्हणून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचे आदेश काढण्यात आले असून, त्यांची बाजू ऐकून घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे लोकमतशी बोलताना बिपीन श्रीमाळी यांनी सांगितले. ‘एनर्जी मिनिस्टर लाईव्ह’ नावाचा व्हॉटसअपचा एक ग्रुप ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयार केला आहे. त्यात राज्यभरातील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. त्या ग्रुपवर खोकले यांनी १४ जुलै रोजी रात्री १२ ते १ च्या दरम्यान एक अश्लील फोटो पोस्ट केला होता. मात्र हे वर्तन सेवानियम क्र. ८६ - ३ अनुसुची ग व सेवानियम ८८ क नुसार गैरकृत्यात मोडतात असे सांगून त्यांच्यावर तात्काळ शनिवारी निलंबनाचे आदेश बजावण्यात आले. सदर अधिकाऱ्यावर वैद्यकीय उपचार चालू असून त्यातून त्याने हा मेसेज पाठवल्याचा खुलासा केला आहे. पण त्याने ज्या डॉक्टरांचे नाव सांगितले व ज्या प्रकारचे उपचार त्यांच्यावर केले जात आहेत असा खुलासा केला आहे त्याची चौकशी केली जाईल पण तोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे श्रीमाळी लोकमतशी बोलताना म्हणाले. खोकले यांनी जे केले ते चुकीचेच आहे पण त्यांनी तसा मेसेज का पाठवला, त्यांच्याकडून हे चुकीने झाले का? याची कोणतीही चर्चा न करता थेट निलंबन करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया यावर उमटली आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्रीमहोदय आणि वरिष्ठ अधिकारी अनेकदा अन्य अधिकाऱ्यांचा पाणउतारा करतात, वाट्टेल ते बोलतात ते कोणत्या शिस्तीत बसते, त्यांच्यावर काय कधी कारवाई केली गेली का? असे प्रश्न महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी केले आहेत. कोणी नाव घेऊन बोलायला तयार नाही पण या घटनेमुळे अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
अश्लील मेसेज पाठवला म्हणून मुख्य अभियंता निलंबित
By admin | Published: July 16, 2017 11:56 AM