- जितेंद्र कालेकर, ठाणेएका महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी निलंबित केलेले ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या चौकशीसाठी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या गृहविभागाने, सहासदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. येत्या दोन महिन्यांत या समितीने याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी जाधव यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामीनही मिळवला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, गृहविभागाने लैंगिक छळवादप्रकरणी जाधव यांची विभागीय चौकशी करण्यासाठी प्रशासन विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यास प्रशासन विभागाने मान्यता दिली असून, मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरविंद सावंत, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अनुपमा पवार, अशासकीय संस्थेच्या फरिदा लांबे हे सदस्य, तर येरवडा कारागृहाच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटवार यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. समितीला आवश्यक ती माहिती, तसेच कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी समितीच्या सदस्य सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. दोषारोपपत्रातील बाबींची सविस्तर चौकशी करून, अहवाल येत्या दोन महिन्यांत शासनाला द्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)अश्वती दोरजे यांची समितीमुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरविंद सावंत, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अनुपमा पवार, अशासकीय संस्थेच्या फरिदा लांबे हे सदस्य, तर येरवडा कारागृहाच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटवार यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
निलंबित कारागृह अधीक्षक चौकशीच्या फेऱ्यात
By admin | Published: December 29, 2016 1:57 AM