ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12- आता दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे किंवा लाल सिग्नल तोडणे आदी प्रकार वाहनचालकांना चांगलेच महागडे पडणार आहेत. परिवहन आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली असून, तीन महिन्यांपर्यंत दोषी वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.
चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाही तर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलिसच राहत नाही. यामुळे बहुसंख्य चौकांमध्ये सामूहिकपणे वाहनचालक सर्रास सिग्नल तोडतात. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात.
गेल्या वर्षी वाहतुकीची पायमल्ली करणाऱ्या सुमारे १०८७ वाहनचालकांचा परवाना वाहतूक पोलिसांनी पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाठविले. मात्र, यातील २९७ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविणे व इतरांवर ६० दिवसांचे निलंबन करण्यात आले. असे असतानाही वाहतूक गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. याची दखल परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतली. गंभीर वाहतूक गुन्ह्यासंदर्भात उदा. दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लाल सिग्नल तोडणे आदी गुन्ह्यांसाठी वाहन चालविणाऱ्याचा वाहन परवाना कमीतकमी तीन महिने कालावधीसाठी निलंबित करण्याबाबत निर्देश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) दिले आहे.