मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३५ कोटी रुपयांच्या एका घोटाळ्याप्रकरणी महामंडळाचे अमरावती क्षेत्रीय व्यवस्थापक अतुल साळुंके यांना निलंबित करण्यात आले आहे. एकूण ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रवादीचे आमदार आणि या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम हे महामंडळाचे अध्यक्ष असताना घडला होता. त्या काळात साळुंके हे महामंडळाच्या मुंबई मुख्यालयात वित्तीय व्यवस्थापक होते. मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यासाठी एकूण २ एकर जागा औरंगाबाद येथे खरेदी करण्यात आली होती. त्यातील काही जागा ही रमेश कदम यांनी स्वत:च्या नावावर खरेदी केली होती. सर्व पैसा हा महामंडळातूनच देण्यात आला. या व्यवहारासाठी साळुंके हे वित्तीय व्यवस्थापक असताना त्यांनी ११ कोटी रुपये आरटीजीएसने पाठविल्याचा आरोप आहे. या शिवाय, रमेश कदम यांच्या मैत्रीयी शुगर कारखान्याला (पैठण) महामंडळाच्या मुख्यालयातून आरटीजीएसने २४ कोटी रुपये पाठविण्यात आले होते. त्यावेळीही साळुंके हेच वित्तीय व्यवस्थापक होते. आता त्यांच्याविरुद्ध सीआयडी लवकरच गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. लोकमतने या दोन्ही घोटाळ्यांवर प्रकाश टाकला होता. जमिनीचा व्यवहार ज्याच्या माध्यमातून झाला होता तो अमरजितसिंह कोहली (औरंगाबाद) याला आधीच अटक करण्यात आली आहे. महामंडळाच्या बुलडाणा, भंडारा, जालना, परभणी, बीड या पाच जिल्हा कार्यालयांमधून एकूण ८५ कोटी रुपये काढण्यात आले होते. त्यातील ५४ कोटी रुपये हे आरटीजीएसने तर अन्य रक्कम रोखीने काढण्यात आली होती. या प्रकरणी हवी तशी कठोर कारवाई सीआयडीकडून अद्याप होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (विशेष प्रतिनिधी)
साठे महामंडळातील क्षेत्रीय व्यवस्थापक निलंबित
By admin | Published: June 16, 2016 3:11 AM