शिक्षणमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
मुंबई : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडून बैठकीची वेळ मिळत नसल्याने शिक्षण बचाव समितीने पुकारलेले बेमुदत शाळाबंद आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृती समितीच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतल्याचे समितीने सांगितले.यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे वेळ मागितली होती. मात्र चर्चेसाठी वेळ दिला जात नाही, असा महामंडळाचा आक्षेप होता. त्यानंतर महामंडळाने कृती समितीसोबत १६ जुलैपासून बेमुदत संपाची घोषणा केली होती. त्याची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षणबचाव कृती समितीचे पदाधिकारी, शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, शिक्षक आमदार रामनाथ मोते, आमदार नागो गाणार यांच्यासोबत गुरूवारी चर्चा केली.कृती समितीसोबत झालेल्या चर्चेनुसार, शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राहणार, २८ आॅगस्ट २०१५ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामध्ये बदल केला असून अजूनही बदल करण्यासाठी महामंडळाने सुचवण्याचे आवाहन केले आहे. शिवायविनाअनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार व मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी केंद्र शासनाशी चर्चा करण्याचे तावडे यांनी मान्य केले. शिक्षकेतरांचा आकृतिबंध येत्या ८ ते १० दिवसांत जाहीर केला जाईल आणि मूल्यांकनास पात्र झालेल्या शाळांना मंजूर झालेले अनुदान तातडीने वितरित केले जाईल, असेही तावडे यांनी सांगितले. याशिवाय अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे कृती समितीने सांगितले.