लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शनिवारी संध्याकाळी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्याने संकेतस्थळ हँग झाले होते. रविवारीही संकेतस्थळ सुरळीत चालू न झाल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कळावा, म्हणून एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना निकाल पाठवण्याचे आदेश सीईटी सेलचे प्रमुख चंद्रशेखर ओक यांनी रविवारी दिले. रात्री ८ नंतर संकेतस्थळ अधिक सर्व्हर लावल्याने सुरळीत सुरू झाल्याचेही सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले. सीईटी सेलने संकेतस्थळ हँग झाल्याची गंभीर दखल घेत, रविवारी पर्यायी उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. एकाच वेळी अनेकांनी संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केल्याने संकेतस्थळ हँग झाल्यामुळे सर्व्हर वाढवण्यात आला. त्याचबरोबरीने तीन पर्यायी योजना राबवण्यात आल्याचे सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले. संकेतस्थळासंदर्भात सीईटी सेलचे प्रमुख चंद्रशेखर ओक यांनी सांगितले, शनिवारी सायंकाळी निकाल जाहीर झाल्यावर लाखो विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिली. यंदा सीईटीला ३ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. एकाच दिवशी इतक्या विद्यार्थ्यांनी निकाल पाहायला लॉग इन केल्याने ही परिस्थिती उद्भवली. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून अतिरिक्त सर्व्हर वाढवण्यात आला. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे निकाल पाठवण्याच्या सूचना दिल्याचेही ओक यांनी स्पष्ट केले. सोमवारपासून सुरू होणारी अभियांत्रिकीची प्रवेश नोंदणी रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी सीईटीचा नोंदणी क्रमांक टाकल्यास त्यांचा निकाल कळत आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळपासून संकेतस्थळ नीट झाली असून, विद्यार्थ्यांनी चिंता न करण्याचे आवाहन या वेळी ओक यांनी केले.
संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थी त्रस्त
By admin | Published: June 05, 2017 5:21 AM