औरंगाबाद : जायकवाडी जलाशयाच्या क्षेत्रातील पाणी चोरीप्रकरणी जलसंपदा विभागाने बुधवारी शाखा अभियंता शेख, कालवा निरीक्षक बी. एन. जाधव आणि मजूर एन. आर. वल्ले यांना निलंबित केले. जलाशयात बेकायदेशीररीत्या चराचे खोदकाम होत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांच्या आदेशावरून मुख्य अभियंता हंगेकर यांनी बुधवारी सकाळी ही कारवाई केली. दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण मराठवाड्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यात जायकवाडी धरणातही जेमतेम पाणीसाठा आहे. अशा परिस्थितीत पैठण तालुक्यात काही बड्या शेतकऱ्यांनी धरणातून पाणी उचलण्यासाठी चक्कजलाशयाच्या क्षेत्रातच चर खोदण्याचे काम सुरू केले होते. सुमारे दीड किलोमीटर चर खोदून हे पाणी तिकडे वळविण्यात येणार होते, त्याआधीच ही बाब समोर आली. तोपर्यंत जलसंपदा विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संबंधितांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. जायकवाडी जलफुगवटा शाखेचे (नाथनगर, उत्तर) शाखा अभियंता शेख, कालवा निरीक्षक बी. एन. जाधव आणि मजूर एन. आर. वल्ले यांचा त्यात समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी दोन शेतकऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. पण खोदकामाचे साहित्य मात्र जप्त केले नाही. जेसीबीचा वापर करून हे खोदकाम केले होते. (प्रतिनिधी)
पाणी चोरीप्रकरणी शाखा अभियंत्यासह तिघे निलंबित
By admin | Published: April 14, 2016 1:17 AM