पुणे : ‘माऊंट एव्हरेस्ट शिखर’ सर केल्याचा दावा करणाऱ्या पोलीस दाम्पत्याचा खोटेपणा उघड होताच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दोघांनाही खात्यामधून निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी कायम ठेवली आहे. यापूर्वी नेपाळ सरकारने त्यांच्यावर १० वर्षांची बंदी घातलेली आहे. पोलीस शिपाई दिनेश चंद्रकांत राठोड आणि पोलीस नाईक तारकेश्वरी चंद्रकांत भालेराव (राठोड) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही सध्या पोलीस मुख्यालयामध्ये नेमणुकीस आहेत. दोघांचाही प्रेमविवाह झालेला असून, त्यांनी यापूर्वी आॅस्टे्रलियामधील सर्वोच्च शिखर सर केल्याचा दावा केला होता.माध्यमांमध्ये यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होताच आर. एक्स. कम्युनिकेशनच्या संचालिका अंजली शरद कुलकर्णी यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन दोघांच्या मोहिमेबाबत संशय व्यक्त केला होता. तसेच प्रसिद्ध झालेले फोटो बनावट असल्याचे सांगितले. सहायक पोलीस आयुक्त गणपत माडगूळकर यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये दोघांनी एव्हरेस्ट शिखर सर केले नसल्याचे समोर आले. कुलकर्णी यांनी ज्या दिवशी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली त्या दिवसापासून दोघेही कर्तव्यावर गैरहजर आहेत. मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६मधील नियम ३ (१-अ)(अ)च्या तरतुदीनुसार तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१मधील नियम २५नुसार शासकीय सेवेमधून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणारे निलंबित
By admin | Published: November 18, 2016 5:33 AM