ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 26 - वाहकाची अपहार प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ५०० पट दंडाच्या परिपत्रकाला एसटी महामंडळाने बुधवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वाहकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे सदर परिपत्रक रद्द व्हावे, यासाठी महामंडळातील जवळपास कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. संघर्ष ग्रुपने २७ व २८ आॅक्टोबरला रजा आंदोलनाची हाक दिली होती.
प्रवाशाकडून रक्कम घेऊनही तिकीट दिली जात नाही. रकमेची अफरातफर केली जाते. वाहन तपासणीत असा प्रकार आढळल्यास वाहकांवर कारवाई होते. अफरातफरीची प्रकरणे नियंत्रणात आणण्यासाठी महामंडळाने तडजोडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र यासाठी दंडाची मोठी रक्कम होती. तिकीट चोरी प्रकरणात पहिल्यांदाच आढळल्यास ५०० पट, दुसºयांदा आढळल्यास ७५० पट रक्कम दंड आणि तिसºयांचा आढळल्यास निलंबनाची कारवाई अशा स्वरूपाच्या प्रस्तावाचे हे परिपत्रक होते. नांदेड जिल्ह्याच्या एका वाहकाला १४०० रुपये अपहारापोटी सात लाख रुपये दंड ठोकण्यात आला होता.
सदर परिपत्रक जुलमी असल्याचे सांगत कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कुठल्याही परिस्थितीत हे परिपत्रक रद्द व्हावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. संघर्ष ग्रुपने २७ व २८ आॅक्टोबर रोजी रजा आंदोलन पुकारले होते. राज्यातील जवळपास आगारातून कामगारांनी मोठ्या संख्येत रजेचे अर्ज दाखल केले होते. अखेर महामंडळाने मंगळवारी या परिपत्रकाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील सूचनेपर्यंत यासंदर्भात कुठलीही कार्यवाही केली जावू नये, असा आदेश यातून दिला आहे. (वार्ताहर)