मुंबई : येत्या १७ सप्टेंबरला मांसविक्री बंदीच्या राज्य शासनाच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली़ न्या़़ अनुप मोहता व न्या़ अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने हे स्थगिती आदेश दिले़ जैन धर्मीयांना पर्युषण काळात हिंसाचार चालत नाही़ मग अंडी व मासे यांच्यावर बंदी का नाही? आणि आम्ही केवळ कायद्याचा विचार करतो़ कायद्यापुढे भावनांना महत्त्व देणे योग्य ठरणार नाही, असे नमूद करीत न्यायालयाने ही स्थगिती दिली़ पर्युषण काळानिमित्त १०, १३, १७ व १८ सप्टेंबर रोजी मांसविक्री बंदी करण्यात आली होती. यापैकी १३ व १८ सप्टेंबरची बंदी पालिकेने घातली होती; तर १० व १७ सप्टेंबरची बंदी शासनाने घातली होती. याविरोधात मटण डिलर असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ त्यानंतर महापालिकेने १३ व १८ सप्टेंबरची बंदी मागे घेतली़ त्यामुळे केवळ १७ तारखेच्या शासनाच्या बंदीचा मुद्दा न्यायालयासमोर सुनावणीसाठी होता़ त्यात न्यायालयाने अंडी व मासे यांचा उल्लेख करीत या बंदीलाही स्थगिती दिली़ याआधीही महापालिकेने २००४मध्ये अशी बंदी घातली होती़ पण, त्याची अंमलबजावणीच झाली नाही़ तेव्हा आता बंदी लागू करणे व्यवहार्य नाही, असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले़ (प्रतिनिधी)
१७ सप्टेंबरच्या मांसविक्री बंदीला स्थगिती
By admin | Published: September 15, 2015 2:42 AM