मुंबई: महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने दादर येथील आंबेडकर भवन सदनाबाबत संबंधित ट्रस्टला अमान्यतेची सूचना दिली आहे. या सुचनेतील अटीनुसार बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त करण्याअगोदर सर्व भाडेकरुंची सहमती घेऊन अस्तित्त्वात असलेले बांधकाम पाडावे अथवा निष्कासनापूर्वी भाडेकरुंची सहमती घेऊन टप्प्याटप्प्याने निष्कासन व बांधकाम असा आराखडा देऊन मंजूर करुन घ्यावा, असे नमूद करण्यात आलेले आहे. तथापि, ट्रस्टने या अटींचे उल्लंघन केलेले आहे.महापौर स्नेहल आंबेकर यांनी १२ जुलै रोजी भवनाला भेट दिली. तसेच १३ जुलै रोजी महापौर निवास येथे अधिकारी वर्गासोबत बैठकही घेण्यात आली. या बैठकीस उपआयुक्त आनंद वागराळकर, एफ/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, कार्यकारी अभियंता खोत हे उपस्थित होते.महापालिकेने दिलेल्या नोटीशीमधील अटींची पूर्तता योग्यरित्या न केल्यामुळे ट्रस्टने नियमाचे उल्लंघन केले आहे. नोटीशीतील अटीनुसार अस्तित्त्वात असलेल्या इमारतीतील सर्व भाडेकरुंना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्याव्या लागतील. तशी जागा देण्यात आलेली नाही. तसेच त्या ठिकाणचा वीज व पाणीपुरवठा खंडीत करावा लागतो. ही प्रक्रियाही करण्यात आलेली नाही. इमारत धोकादायक असल्यामुळे निष्कासित करण्याकरीता त्याचा आराखडा व त्याचे टप्पे तयार करुन निष्कासित करणे गरजेचे होते. त्यामुळे अमान्यतेच्या सुचनेतील, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तता केल्याशिवाय व बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय या ठिकाणी पुढे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करु नये, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.दादर येथील आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण ट्रस्ट पाडण्याची इम्प्रूव्हमेंट कमिटीची कारवाई बेकायदेशीर असून यासंपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्तया नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत येथील कारवाईस स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे यांनी अलीकडेच आंबेडकर भवन परिसराला भेट देत पाहणी केली.
‘आंबेडकर भवनच्या बांधकामाला स्थगिती’
By admin | Published: July 15, 2016 3:11 AM