मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या थकीत विजबिलांच्या वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे शेतीमधील आर्थिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे त्यांना थकीत वीजबिलाचा भरणा करणेही अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कृषिपंपाच्या वारेमाप बिलांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्यातच वीज मंडळाकडून बील थकलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा विजपुरवठा तोडण्यात येत होता. त्यामुळे शेतीसाठीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता.
दरम्यान, राज्य शासनाने मगील 3 वर्षात 4 लाख 64 हजार कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून उर्वरित 2 लाख 45 हजार प्रलंबित कृषीपंपांना उच्च दाब प्रणाली मार्फत (एचव्हीडीसी) कनेक्शन देण्यात येणार असून हे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले. आ. सत्यजित पाटील व अन्य आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी 2018 पर्यंत 21,632 कृषीपंपांना कनेक्शन देण्यात आले असून सांगली जिल्ह्यात जानेवारी 2018 पर्यंत 24,703 कृषीपंपांना कनेक्शन देण्यात आले. जानेवारी 2018 पर्यंत 15,906 कृषीपंप पैसे भरून प्रलंबित आहेत.