मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर हे मुळात या पदासाठी ठरलेल्या अर्हता निकषांनुसार निवडीसाठी पात्र होते का याचा ‘शोध समिती’ने (सर्च कमिटी) फेरविचार करावा या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली.असे असले तरी ‘शोध समिती’चा फेरविचार पूर्ण होईपर्यंत डॉ. वेळुकर यांनी कुलगुरुपदाचे काम करू नये, हा राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांचा आदेश कायम असल्याने डॉ. वेळुकर यांना पदापासून तूर्तास तरी दूर राहावे लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘शोध समिती’ने डॉ. वेळुकर यांच्या पात्रतेची फेरतपासणी चार आठवड्यांत करायची होती. नवी ‘शोध समिती’ नेमायची असेल तर ती दोन आठवड्यात नेमायची होती. समितीने डॉ. वेळुकर यांना अपात्र ठरविले तर कुलपतींनी पुढील आदेश द्यावे, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. वसंत गणु पाटील, डॉ. ए.डी. सावंत आणि नितीन देशपांडे यांच्या याचिकांवर हे आदेश झाले होते. त्याविरुद्ध डॉ. वेळुकर यांनी केलेल्या विशेष अनुमती याचिकांवरील सुनावणीत सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु आणि न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालायच्या ११ नोव्हेंबर २०१४ व ११ फेब्रुवारी २०१५ च्या निकालांना अंतरिम स्थगिती दिली. मूळ याचिकाकर्त्यांनी चार आठवड्यांत उत्तराची प्रतिज्ञापत्रे करावी व वेळूकरांना ३ आठवड्यात प्रत्युतर द्यायची सूचना केली.
कुलगुरुंच्या पात्रता फेरतपासणीस स्थगिती
By admin | Published: February 28, 2015 5:20 AM