मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावासाठी घेण्यात विशेष अधिवेशनात राज्यपाल विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून निलंबित केलेल्या काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मंगळवारी रद्द करण्यात आले. विशेष अधिवेशनासाठी सभागृहात आलेल्या राज्यपालांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की केली, असा आरोप ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस पक्षाचे राहुल बोंद्रे (चिखली), अब्दूल सत्तार (सिल्लोड), अमर काळे (आर्वी), जयकुमार गोरे (माण) आणि विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) अशा पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित केले होते. आमदारांवरील निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी काँग्रेस पक्षाने नागपूर अधिवेशनात सरकारकडे मागणी लावून धरली होती. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व काँग्रेसचे काही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मात्र सरकार योग्य संधीची वाट पाहात होते. आ. विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या अशासकीय ठरावावरून फडणवीस सरकारला आयतीच संधी मिळाली. स्वतंत्र विदर्भाचा ठराव येणे भाजपासाठी अडचणीचे होते. तो मागे घ्या अशी त्यांची मागणी होती. ठराव मागे घ्यायचा असेल तर आमच्या सदस्यांचेही निलंबन मागे घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता. आ. वडेट्टीवार यांचा ठराव शुक्रवारी पुढे ढकलण्यात आला आणि हे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी आज मंगळवारी विधानसभेत केली. (विशेष प्रतिनिधी)
काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन रद्द!
By admin | Published: December 24, 2014 2:21 AM