मुंबई : बदलीच्या ठिकाणी सेवेत रु जू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी/अधिकारी बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू झाले नाहीत तर त्यांना सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने या बाबतचे परिपत्रक अलिकडेच काढले. बदलीच्या ठिकाणी तत्काळ रु जू न झाल्यास संबंधिताची सेवा ते पुन्हा रु जू होईपर्यंत खंडीत समजली जाणार आहे.तसेच त्या काळातील वेतनही कापले जाणार आहे. त्याचप्रमाणे बदली नाकारणाऱ्यांना पदोन्नतीही नाकारली जाणार आहे. बरेचदा काही अधिकारी, कर्मचारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदलीचा प्रस्ताव सादर करतात. संबंधित विभागाला कल्पना नसताना बदलीचे आदेश धडकतात. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकाराबद्दल तीव्र नाराजी मध्यंतरी व्यक्त केली होती. त्यामुळे यापुढे कोणीही थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदलीचा अर्ज देऊ नये. समजा तसे केलेच तर तो अर्ज बेदखल करण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)
बदलीच्या ठिकाणी न गेल्यास निलंबन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2016 3:47 AM