बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात तुफान राजकारण सुरु झाले आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाची बीडमध्ये मोठी सभा होत आहे. या ठिकाणी संजय राऊतांचे भाषण होणार आहे. याची तयारीची पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे गेल्या असता तिथे काही पदाधिकाऱ्यांशी वाद झाल्याचे समोर आले आहे. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी अंधारे यांना चापटाही लगावल्याचा दावा केला होता. त्यांनतर लगेच पक्षाने जाधव यांच्या सह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
सामनामधून याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभास्थळी पाहणी करत होते. याचवेळी जाधव व वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केली. त्यातील जाधव यांच्या काळ्या रंगाच्या गाडीची काचही फोडण्यात आली. इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणे सोडविल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही. परंतू नंतर जाधव यांनी व्हिडीओद्वारे सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले. तसेच त्यांना आपण दोन चापट्याही लगावल्याचा दावा त्यांनी केला. परंतु याची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर लगेच ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत अप्पासाहेब जाधव व संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. सामना मुखपत्रातून याची घोषणा केली आहे
जाधव म्हणाले, अंधारेंना दोन चापटा लगावल्यासभास्थळाची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. सध्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू यावर त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि सुषमा अंधारे यांचे झाले आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या, अशी प्रतिक्रिया खूद्द जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे. याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही.
या साऱ्या प्रकरणावर अंधारेंकडून काही प्रतिक्रिया आलेली नाहीय. तर ठाकरे गटाकडून जाधव यांच्यासह आणखी एक पदाधिकारी पाटील यांची पक्षविरोधी कारवाई केल्याने हकालपट्टी करण्यात आली आहे.